Suhas bhalekar biography template
खलनायकी, साहाय्यक ढंगाच्या भूमिका गाजवलेले रंगकर्मी.. मुलगाही आहे अभिनेता
मराठी सृष्टीतील रंगकर्मी दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांचा आज २ मार्च रोजी स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. कामगार वस्तीत सुहास भालेकर यांचे बालपण गेले. वडिलांचा नाटकातून काम करण्याला विरोध असूनही कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
आईच्या पाठिंब्यामुळेच सुहास भालेकर यांचे रंगभूमीवर पाऊल पडले. त्यांची कलेची आवड त्यांना शाहीर साबळे आणि पार्टीत घेऊन गेली. इथे त्यांनी अनेक वर्षे काम केले. नाटकातील त्यांचा प्रवास सुरु असतानाच अरुणा विकास यांच्या शक या हिंदी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली.
महेश भट यांच्या सारांश चित्रपटातली विसुभाऊंची भूमिका ही त्यांची सर्वात आवडती भूमिका होती.
झुंज, चानी, निवडुंग, अष्टविनायक, बाळाचे बाप ब्रह्मचारी, दोन बायका फजिती ऐका, सुशीला, गहराई. दामिनी, बरसात, चक्र अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विनोदी तसेच खलनायक साकारला. आतून कीर्तन वरून तमाशा, कशी काय वाट चुकलात, कोंडू हवालदार, बापाचा बाप अशा नाटकातून, लोकनाट्यातून त्यांनी कधी अभिनय तर कधी दिग्दर्शकाची भूमिका बजावली.
गोट्या, असंभव, भाकरी आणि फुल, वहिनीसाहेब अशा मालिका देखील त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या होत्या. असंभव मालिकेत त्यांनी साकारलेली सोपनकाकांची भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. दरम्यान वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत त्यांनी नोकरी सांभाळून अभिनय क्षेत्रात भरीव योगदान दिले.
वयाच्या ८० व्या वर्षी देखील ते मालिकेतून उत्स्फूर्तपणे सक्रिय झालेले पाहायला मिळाले होते.
सिने आणि नाट्य दृष्टीतील या हरहुन्नरी कलाकाराने रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने नेहमीच मंत्रमुग्ध केले. २ मार्च २०१३ साली फुफ्फुसाच्या आजाराने सुहास भालेकर यांचे निधन झाले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा हेमंत भालेकर हे देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाले. निनाद या नाट्यसंस्थेशी ते जोडले गेले. इथूनच त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरु झाला.
संसारगाथा, पाहुणा, अथांग, अधांतर, हसण्यावारी घेऊ नका अशा नाटक आणि चित्रपटातून त्यांनी कधी दिग्दर्शन तसेच अभिनेता म्हणून काम केले आहे. आज सुहास भालेकर यांचे दहावे पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.